Shirkai Devi | राजधानी किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिरकाई देवी

असंख्य शिवप्रेमींचे श्रद्धास्थान; कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी देवीचे होते विधिवत पूजन
Shirkai Devi
राजधानी किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिरकाई देवीPudhari Photo
Published on
Updated on
इलियास ढोकले, नाते

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक वर्षभर येतात. किल्ल्यावर आल्यावर रायगडाची गडदेवता असलेल्या श्री शिरकाई (शिर्काई) देवीचे दर्शन घेऊनच अनेकांचा गडाचा प्रवास सुरू होतो. रायगड किल्ल्यावर असणारे संपूर्ण पाषाणाचे शिरकाई देवीचे हे मंदिर अनेक शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. (Shirkai Devi )

रायगड किल्ल्यावर गंगासागर तलावाकडून होळीच्या माळावर जाण्यासाठी थोडीशी चढण चढली की डाव्या बाजूला शिरकाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडल्याचे सांगितले जाते. रायगडावर अनेक ऐतिहासिक ठिकाणे असून ती पाहण्यासाठी देशविदेशातून शिवप्रेमी येतात.

शिरकाई देवीची मूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रूपातील आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी सभागृह अथवा गाभा नाही. गाभार्‍याच्या ठिकाणी पाषाणरूपी देव्हारा बांधण्यात आला असून यामध्ये देवीची मूर्ती स्थानापन्न आहे. रायगडावर झालेल्या तोफांच्या हल्ल्यांमध्ये मंदिराचेही मोठे नुकसान झाले होते. परंतु तरीही मंदिराच्या चहुबाजूला असलेली तटबंदी आजही टिकून आहे. मंदिराच्या भोवताली दगडी भिंत असून पूर्व दिशेच्या मार्गाने आत प्रवेश करता येतो. मध्यभागी दगडी देव्हार्‍यामध्ये अष्टपुजा महिषासुरमर्दिनीची शिरकाई देवीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. आजही दररोज देवीची विधिवत पूजा केली जाते. पेशवेकालीन दप्तरांमध्ये शिरकाई देवीच्या मंदिराची नोंद आढळते.

Shirkai Devi
Saptashrungi Devi Vani : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी देवी

आजही रायगडावर कोणताही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गडदेवतेचे पूजन केले जाते. देवीचा गोंधळ केला जातो. रायगडावर श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री वाडेश्वर, श्री भवानी माता व श्री शिरकाई देवीची मंदिरे आहेत. यामध्ये शिरकाई देवीचे मंदिर अतिशय जुने मानले जाते. रायगडावर येणारा प्रत्येक शिवप्रेमी शिरकाई देवी पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्रीशिरकाई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली.

रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्रीशिरकाई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही कायम आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरांमध्ये देखील शिरकाई देवीची नोंद आहे. शिरकाई म्हणजे, महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते.

किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिरकाई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिरकाई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिरकाई देवीचे मंदिर आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता मानली जाते. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.

शिरकाई देवीची मूर्ती अष्टभूजा असलेली महिषासुरमर्दिनी भवानीची आहे. मूर्ती शिवपूर्वकालातील असावी, माधवराव पेशव्यांचे सरदार आपाजी हरी यांनी 1773 मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतल्याची, नव चंडिकायाग केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये घट उठल्यानंतर शिरकाई देवीच्या गोंधळ होई. 1786 मध्ये हा गोंधळ विधी बंद करण्यात आला.

गडाच्या माथ्यावर राजमहालाजवळ शिरकाई मातेचे मंदिर आहे. मोरे याच्याकडून जावळी सुभा स्वराज्यात आल्यावर रायगड शिवशाहीत आला. त्यावेळी गडावर अनेक कामे करण्यात आली. इमारती उभ्या राहिल्या त्याचवेळी शिरकाई देवीचे मंदिर बांधण्यात आले. नंतरच्या काळात रायगड संकटात सापडला. गडावर अनेक घडामोडी घडल्या; पण 1773 नंतरच्या काळात अप्पाजी हरी याने रायगड पुन्हा ताब्यात घेतल्यापासून पेशवाईत गड पुन्हा नांदता झाला.

आदीमाया माता शिरकाई ही रायगडावरील प्रमुख देवता आहे. 1773 मध्ये सप्टेंबर महिन्यात इथे नवचंडीचा होम करण्यात आल्याचा उल्लेख दप्तरात सापडतो. देवीच्या खर्चास उत्पन्न लाऊन देण्यात येत असे. 8 ऑक्टोबर 1775 मध्ये महाड येथून दोन चांदीचे मुखवटे शिरकाई देवीसाठी खास करुन घेऊन गडावर पाठवल्याची नोंद पहावयास मिळते.

देवीस दिली जात होती तोफांची सलामी

उत्सवावेळी देवीस तोफांची सलामी देण्यात येत असे. देवीच्या सभा मंडपासमोर तोफ सजवलेली असे. गडावर अतिशय नावाजलेल्या तोफा होत्या. अचूक मार्‍याबद्दल त्या तोफांची ख्याती होती. रायगडावर गंगासागर, मुल्लांना, पेरुजंगी, भुजंग, रामचंडी, पदाणी, फत्तेलष्कर, फत्तेजंग सुंदर, रेकम, मुंगशी शिवप्रसाद गणेश, लंगडा कसाब, चांदणी भवानी, नागीण इत्यादी युद्धात नाम कमावलेल्या अचुक मारा करणार्‍या तोफा होत्या. अप्पाजी हरी याने देवी जाखमाता बुरुजावर पहारा देणारी लंगडा कसाब ही तोफ मोठ्या प्रयत्नाने रायगडावर नेली, अशी माहिती इतिहासात नोंद करण्यात आली आहे.

Shirkai Devi
कालिका यात्रोत्सवास प्रारंभ | पहिल्याच माळेला हजारो भाविक देवीच्या चरणी लीन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news